Do Reports

टिटवाळा-कसारा रेल्वे सेवा आज रात्री ठप्प; मध्य रेल्वेचा विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक

DR
By Do Reports Desk
टिटवाळा-कसारा रेल्वे सेवा आज रात्री ठप्प; मध्य रेल्वेचा विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक

विशेष ब्लॉकमधील ९ सप्टेंबर हा १३ वा दिवस आहे. या काळात टिटवाळा-कसारा दरम्यानची उपनगरीय रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळेत रेल्वे प्रवासाचे नियोजन करताना बदल करावा लागणार आहे.

डोंबिवली

मध्य रेल्वेवरील टिटवाळा स्थानकात १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी मध्य रेल्वेकडून १५ दिवसांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत असून, ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री पुन्हा विशेष ब्लॉक लागू करण्यात येणार आहे. २८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री ११.३० ते पहाटे ५.१० या वेळेत सुमारे ५ ते ६ तासांचा ब्लॉक घेण्यात येत आहे. या विशेष ब्लॉकमधील ९ सप्टेंबर हा १३ वा दिवस आहे. या काळात टिटवाळा-कसारा दरम्यानची उपनगरीय रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळेत रेल्वे प्रवासाचे नियोजन करताना बदल करावा लागणार आहे.

टिटवाळ्याऐवजी आसनगावपर्यंत लोकल

ब्लॉकच्या कालावधीत टिटवाळा येथे येऊन संपणाऱ्या लोकल आता आसनगावपर्यंत धावणार आहेत. त्याचप्रमाणे टिटवाळाहून सुटणाऱ्या लोकल आसनगाव स्थानकातून सुरू करण्यात येणार आहेत. ९ सप्टेंबरच्या रात्री ११.३० ते १० सप्टेंबरच्या पहाटे ५.१० वाजेपर्यंत विशेष ब्लॉक असणार आहे. या काळात टिटवाळ्यापर्यंत येणाऱ्या सर्व लोकल आसनगावपर्यंत वाढवण्यात येतील, तर टिटवाळ्याहून सुटणाऱ्या सेवा आसनगावहून सुरू होतील.

२३ लोकल फेऱ्या रद्द

या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेने डाऊन मार्गावरील १२ आणि अप मार्गावरील ११ अशा एकूण २३ लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. काही लोकल सेवा ठाणे किंवा कल्याणपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. वातानुकूलित टिटवाळा लोकलचाही प्रवास ठाणेपर्यंतच मर्यादित राहणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या डाऊन सेवा

सीएसएमटीहून रात्री १०, १०.५०, ११.१६ आणि ११.४२ वाजता सुटणाऱ्या टिटवाळा लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीहून सकाळी ८.४१ आणि रात्री ८.४२ वाजता सुटणाऱ्या कुर्ला लोकल, सीएसएमटीहून रात्री १२.०८ वाजता सुटणारी कसारा लोकल आणि सकाळी ८.०८ वाजता सुटणारी ठाणे लोकलही रद्द करण्यात आली आहे. याशिवाय ठाण्याहून पहाटे ५.३५ वाजता सुटणारी टिटवाळा लोकल, कुर्ल्याहून सायंकाळी ५.५९ वाजता सुटणारी कल्याण लोकल आणि सीएसएमटीहून रात्री ८.५६ वाजता सुटणारी आसनगाव लोकल रद्द राहणार आहे.

अप मार्गावरील सेवा

टिटवाळाहून सकाळी ६.१३, रात्री ९ आणि रात्री १०.०६ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ठाण्याहून सकाळी ९.०८ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल, कल्याणहून सायंकाळी ७.०२ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल आणि टिटवाळाहून सकाळी ८.०९ वाजता सुटणारी परळ लोकलही रद्द करण्यात आली आहे. तसेच टिटवाळाहून रात्री १०.२५ आणि ११.१४ वाजता सुटणाऱ्या ठाणे लोकल आणि आसनगावहून रात्री ११.०८ वाजता सुटणारी ठाणे लोकल रद्द करण्यात आली आहे.

१५ डब्यांच्या लोकलसाठी महत्त्वाचे काम

टिटवाळा स्थानकातील फलाट विस्तारीकरणाचे हे काम भविष्यात १५ डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र कामाच्या कालावधीत रात्रीच्या लोकल सेवांवर परिणाम होत असल्याने टिटवाळा, आसनगाव, कसारा आणि परिसरातील प्रवाशांना त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. प्रवाशांनी रात्रीच्या वेळेत प्रवास करण्यापूर्वी संबंधित लोकलची उपलब्धता आणि वेळ तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित विषय (Tags):
#mumbai#central railway#asangon#kasara#mega #block
Share This Article (बातमी शेअर करा):
DR

Do Reports Desk

Special Correspondent | Do Reports

Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.

Join Do Reports WhatsApp Channel

ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा

Join Channel