Do Reports

पुण्यातील मोदींच्या प्रतिमेच्या मुद्द्यावरून KDMC महासभेत भाजपचा निषेध; मनसे नगरसेवकांना बोलू न दिल्याचा आरोप

Vikrant Nalawade
By Vikrant Nalawade
पुण्यातील मोदींच्या प्रतिमेच्या मुद्द्यावरून KDMC महासभेत भाजपचा निषेध; मनसे नगरसेवकांना बोलू न दिल्याचा आरोप

पुण्यातील मोदींच्या प्रतिमेच्या मुद्द्यावरून KDMC महासभेत भाजपने निषेध नोंदवला. मनसे नगरसेवकांना बोलू न दिल्याचा आरोप करत सभागृहात राष्ट्रगीत सुरू करण्यात आले.

पुणे येथील एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या सूचनेवरून काढण्यात आल्याचा मुद्दा आता कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेतही गाजला. या प्रकरणावर भाजपने तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त करत निदर्शने केली होती. त्यानंतर बुधवारी झालेल्या KDMC महासभेत भाजपने अमित ठाकरे यांच्या या कृतीचा मुद्दा उपस्थित करत निषेध नोंदवला. या विषयावर महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली. भाजपचे गटनेते नगरसेवक शशिकांत कांबळे यांनी तहकुबीची मागणी करत देशाच्या सर्वोच्च नेत्याचा अवमान करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे म्हटले. भाजपच्या तहकुबीच्या मागणीनंतर सभागृहात मनसेच्या नगरसेवकांनीही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. शिंदे शिवसेनेबरोबर सत्तेत असलेले मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, गणेश लांडगे आणि इतर नगरसेवक तातडीने उभे राहिले. मात्र सभागृह नेत्यांनी तहकुबीला अनुमती दिली. त्यानंतर प्रल्हाद म्हात्रे आणि गणेश लांडगे यांनी आम्हाला बोलू द्या, अशी मागणी सुरू ठेवली. मात्र त्यांची मागणी विचारात न घेता राष्ट्रगीत सुरू करण्यात आले.

KDMC सत्तेत मनसेच्या भूमिकेवरही चर्चा

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तेत शिंदे शिवसेना आणि भाजप हे पक्ष आहेत. शिंदे शिवसेनेच्या पक्षातील शिवशाही गटात मनसेचे नगरसेवक सहभागी आहेत. त्यामुळे मनसेचे स्वतंत्र अस्तित्व नसल्याचा मुद्दा या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आला आहे. शिंदे शिवसेना सभागृहात भूमिका मांडेल आणि निर्णय घेईल, त्याप्रमाणे मनसेच्या नेत्यांना भूमिका घ्यावी लागत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे याचा मोठा फटका मनसेला बसत असल्याचेही या राजकीय घडामोडींमध्ये बोलले जात आहे. भाजपसोबतच्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेला निर्णय मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पटलेला नसल्याचेही या संदर्भातील चर्चेतून समोर येत आहे.

प्रल्हाद म्हात्रे आणि गणेश लांडगे यांच्या भूमिकेकडे लक्ष

मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे आणि गणेश लांडगे हे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. प्रल्हाद म्हात्रे हे संत साहित्याचे अभ्यासक आणि आध्यात्मिक विषयांचे अभ्यासक आहेत, तर दोन्ही नगरसेवकांनी यापूर्वी सभागृहात विविध विषयांवर भूमिका मांडली आहे. परिवहन समितीत असताना प्रल्हाद म्हात्रे यांनी सुमारे सात वर्षांपूर्वी परिवहन समिती आणि व्यवस्थापनाला विविध विषयांवरून धारेवर धरले होते. मात्र आता सभागृहात स्वतंत्रपणे आपली मते मांडताना त्यांची कोंडी होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे मनसेचे नगरसेवक इतर विरोधी पक्षांकडूनही लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे.


पंतप्रधानांच्या प्रतिमेबाबत मनसेची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगताना म्हात्रे म्हणाले की, “महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांची प्रतिमा नसावी, ही मनसेचे नेते राज ठाकरेंची भूमिका आहे. त्यात चुकले काय.”

मनसेच्या सत्तेतील सहभागावरही प्रल्हाद म्हात्रे यांनी भाष्य केले. “आम्ही सत्तेत आहोतच. याउलट हेच भाजप सत्तेत वाटा घ्यायला आले आहेत. अन्यथा यांची अवस्था खूप बिकट झाली असती,” असे म्हात्रे म्हणाले.

पुण्यातील एका महाविद्यालयातील प्रतिमेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय पटलावर पोहोचला असून, महासभेतील या घडामोडींमुळे शिंदे शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यातील स्थानिक राजकीय समीकरणांचीही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

संबंधित विषय (Tags):
#KDMC#BJP#MNS#PM Modi#Amit Thackeray
Share This Article (बातमी शेअर करा):
Vikrant Nalawade

Vikrant Nalawade

Editorial

Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.

Join Do Reports WhatsApp Channel

ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा

Join Channel