Do Reports

Mumbai Auto Taxi : टॅक्सी आणि ऑटोरिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता आणखी झळ

DR
By Do Reports Desk
Mumbai Auto Taxi :  टॅक्सी आणि ऑटोरिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता आणखी झळ

सुधारित भाडे 1 सप्टेंबरपासून लागू होणार असले तरी वाहनांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी चालकांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत प्रवाशांकडून सुधारित भाडे आकारण्यासाठी चालकांना नवीन भाडे तक्त्याचा वापर करण्याच्या सूचना

मुंबई : मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सी आणि ऑटोरिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. 1 सप्टेंबरपासून मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) मंजूर केलेले सुधारित दर लागू होणार आहेत.

नवीन दरानुसार टॅक्सीचा किमान भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये करण्यात आले आहे. तर ऑटोरिक्षाचे किमान भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये होणार आहे. तब्बल 18 महिन्यांनंतर टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी 2025 रोजी दोन्ही वाहनांच्या भाड्यात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

सुधारित भाडे 1 सप्टेंबरपासून लागू होणार असले तरी वाहनांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी चालकांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत प्रवाशांकडून सुधारित भाडे आकारण्यासाठी चालकांना नवीन भाडे तक्त्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

RTO अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबरपर्यंत मीटर रिकॅलिब्रेशन न करणाऱ्या चालकांवर 1 डिसेंबरपासून कारवाई होऊ शकते. यामध्ये दररोज 50 रुपयांचा दंड आकारण्याचा प्रस्ताव असून, हा दंड जास्तीत जास्त 5 हजार रुपयांपर्यंत असू शकतो.

दरम्यान, लाखो वाहनांचे मीटर तीन महिन्यांत अपडेट करण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागासमोर आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 4.17 लाख नोंदणीकृत ऑटोरिक्षा आणि 44,825 काळी-पिवळी टॅक्सी आहेत. मात्र, मीटर तपासणी आणि रिकॅलिब्रेशनसाठी केवळ 15 ते 20 अधिकृत केंद्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे मीटर अपडेट करण्यासाठी वाहनचालकांना मोठ्या प्रतीक्षा कालावधीला सामोरे जावे लागू शकते.

मीटर रिकॅलिब्रेशनच्या प्रक्रियेत अधिकृत डीलरकडून मीटरमध्ये नवीन चिप अपडेट केली जाईल आणि प्राथमिक तपासणी केली जाईल. त्यानंतर RTO अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची 1.5 किलोमीटरची प्रत्यक्ष रस्त्यावरील चाचणी घेतली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मीटरला मंजुरी दिली जाईल.

मीटर अपडेट होईपर्यंत प्रवाशांना सुधारित भाडे तक्त्यानुसार पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे नवीन भाडे लागू झाल्यानंतर पुढील तीन महिन्यांचा कालावधी प्रवासी, चालक आणि परिवहन विभागासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

संबंधित विषय (Tags):
#auto#taxi#rate hike#mumbai#new
Share This Article (बातमी शेअर करा):
DR

Do Reports Desk

Special Correspondent | Do Reports

Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.

Join Do Reports WhatsApp Channel

ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा

Join Channel