Do Reports

राज्यातील पहिला काचेचा पूल; जव्हारच्या पर्यटनाला नवी झेप

सं
By संदीप साळवे
राज्यातील पहिला काचेचा पूल; जव्हारच्या पर्यटनाला नवी झेप

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण होऊन १५ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेल्या या पुलाकडे ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक सह गुजरात राज्यातील पर्यटकांचा ओढा वाढत आहे

जव्हार, दि.३०; प्रतिनिधी

जव्हार : निसर्गसंपदेने नटलेल्या जव्हारच्या पर्यटनविश्वात आता आणखी एका आकर्षक पर्वाची भर पडली आहे. प्रसिद्ध दाभोसा धबधब्याजवळ उभारण्यात आलेल्या काचेच्या पुलामुळे पर्यटकांना थरारक अनुभवासह निसर्गसौंदर्य न्याहाळण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील काचेच्या पूल पर्यटनस्थळांपैकी हा पहिलाच प्रकल्प असल्याने जव्हारच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण होऊन १५ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेल्या या पुलाकडे ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक सह गुजरात राज्यातील पर्यटकांचा ओढा वाढत आहे. पारदर्शक काचेवरून चालताना पायाखाली दिसणारी खोल दरी, समोर कोसळणारा दाभोसा धबधबा आणि सभोवतालचा हिरवाईने नटलेला परिसर पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करीत आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, जव्हारच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. कल्पक विचार आणि तंत्रज्ञानाची सांगड घातल्यास ग्रामीण व दुर्गम भागातील पर्यटनस्थळांनाही जागतिक दर्जाची ओळख मिळू शकते, याचे दाभोसा येथील काचेचा पूल हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

ठेकेदार अभियंता हर्षद मेघपुरिया यांच्या कल्पकतेतून साकारला थराराचा अनुभव, संकल्पनेचे कौतुक
या अभिनव प्रकल्पामागे पुलाची रचना व उभारणी करणारे ठेकेदार अभियंता हर्षद मेघपुरिया यांची कल्पकता आणि दूरदृष्टी महत्त्वाची ठरली आहे. निसर्गरम्य स्थळाचे सौंदर्य अबाधित ठेवून पर्यटकांना वेगळा अनुभव देण्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरविली आहे. आधुनिक अभियांत्रिकी, सुरक्षितता आणि पर्यटनाची कल्पनाशक्ती यांचा सुंदर मिलाफ या पुलात दिसून येतो.

संबंधित विषय (Tags):
#Jawhar#raygad
Share This Article (बातमी शेअर करा):
सं

संदीप साळवे

Special Correspondent | Do Reports

Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.

Join Do Reports WhatsApp Channel

ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा

Join Channel