Do Reports
WelfareDo Reports

आपला बाप्पा आपणच तयार करू; गोपाळनगर उत्साही युवक मंडळाचा उपक्रम

DR
By Do Reports Desk
आपला बाप्पा आपणच तयार करू; गोपाळनगर उत्साही युवक मंडळाचा उपक्रम

या उपक्रमात प्रभागातील ४० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेत आपल्या हाताने गणपतीची मूर्ती तयार केली. छोट्या कलाकारांनी आपल्या कल्पकतेचा आणि कौशल्याचा वापर करत “आपला बाप्पा आपणच तयार करू” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली.

डोंबिवली : गोपाळनगर उत्साही युवक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “आपला बाप्पा आपणच तयार करू” हा उपक्रम आज उत्साहात पार पडला. गेल्या वर्षी नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादापेक्षा यंदा अधिक उत्साहाने नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. जागेची आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता यावेळी हा उपक्रम काही प्रमाणात मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. मात्र, मर्यादित सहभाग असूनही विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक तात्यासाहेब माने, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील (छोटू) मोकाशी, मंडळाचे माजी खजिनदार व ज्येष्ठ कार्यकर्ते जतीनजी शहा, गणेशोत्सवासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देणारे गिरीश मोकाशी सर तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक शेखर संते सर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

या उपक्रमात प्रभागातील ४० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेत आपल्या हाताने गणपतीची मूर्ती तयार केली. छोट्या कलाकारांनी आपल्या कल्पकतेचा आणि कौशल्याचा वापर करत “आपला बाप्पा आपणच तयार करू” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली. मूर्ती तयार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

गोपाळनगर उत्साही युवक मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य, विद्यार्थी हिताचे उपक्रम तसेच समाजासाठी विविध कार्यक्रम सातत्याने राबविण्याचा प्रयत्न केला जातो. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन अधिक उत्साहाने करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मेहनत घेणारे कार्यकर्ते, सहकारी, पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्रतीक अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.

संबंधित विषय (Tags):
#dombivli#gopalnagar#aapla bappa
Share This Article (बातमी शेअर करा):
DR

Do Reports Desk

Special Correspondent | Do Reports

Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.

Join Do Reports WhatsApp Channel

ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा

Join Channel