Do Reports

Dombivli : डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा त्रास कायम; रिक्षांच्या रांगेमुळे प्रवाशांची पुन्हा फरफट

Vikrant Nalawade
By Vikrant Nalawade
Dombivli : डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा त्रास कायम; रिक्षांच्या रांगेमुळे प्रवाशांची पुन्हा फरफट

डोंबिवली : मानपाडा रोड आणि पुढे कल्याण-शिळ मार्गावर दिवसभर सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीकरांच्या अडचणी कायम आहेत. त्यातच गर्दीच्या वेळेत रिक्षांची सेवा कमी होत असल्याने प्रवाशांना रिक्षा मिळण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही समस्या विशेषतः संध्याकाळच्या वेळेत गंभीर ठरत आहे. नोकरी आणि कामावरून परतल्यानंतर लोकलचा प्रवास पूर्ण करून घरी जाण्यासाठी पुन्हा रिक्षांच्या रांगेत ताटकळावे लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. काही वेळा ही प्रतीक्षेची रांग पूर्वेकडील भागातून रेल्वे पूल ओलांडून पश्चिमेकडे पोहोचत असल्याचेही समोर आले आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीला प्रवाशांचे आंदोलन

रिक्षा उपलब्ध होत नसल्याच्या समस्येविरोधात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला प्रवाशांनी रिक्षा स्थानकात आंदोलन केले होते. सागर्ली, शनी मंदिर आणि मानपाडा या भागांकडे जाण्यासाठी रांगेत बराच वेळ थांबूनही रिक्षा उपलब्ध होत नसल्याची तक्रार त्यावेळी करण्यात आली होती.

यानंतर आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनीही रस्त्यावर उतरून परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा प्रवाशांकडून केला जात आहे.

बससेवाही वाहतूक कोंडीत अडकते

प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या बससेवेलाही वाहतूक कोंडीचा फटका बसत असल्याचे सांगण्यात येत आहे. गर्दीच्या वेळेत बसदेखील कोंडीत अडकत असल्याने प्रवाशांना अपेक्षित दिलासा मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पुढील प्रवासासाठी पुरेशा आणि सुरळीत वाहतूक सुविधांची गरज आहे.

रिक्षाचालकांचीही वेगळी बाजू

दरम्यान, रिक्षाचालकांकडूनही या समस्येबाबत वेगळी बाजू मांडण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर स्टेशन ते सोनारपाडा किंवा पलावा या मार्गांवर रिक्षांच्या अनेक फेऱ्या होतात. मात्र संध्याकाळी सहा वाजल्यानंतर वाहतूक कोंडीमुळे एका रिक्षाला केवळ एक-दोन फेऱ्या करणे शक्य होते. त्यामुळे अनेक रिक्षाचालक संध्याकाळी लवकरच सेवा थांबवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रस्ता रुंदीकरणाची मागणी

मानपाडा मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डोंबिवली ते शनी मंदिरपर्यंतचा रस्ता रुंद करण्याची मागणीही पुढे आली आहे.

पेंढरकर महाविद्यालय, सागाव, दत्तनगर, सुनीलनगर आणि नांदिवली या दिशेने जाणाऱ्या काही मार्गांवर तुलनेने कमी कोंडी असल्याने रिक्षाचालक त्या मार्गांना अधिक पसंती देत असल्याचेही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मानपाडा मार्गावरील प्रवाशांना प्रतीक्षेचा सामना करावा लागत आहे.

वाहतूक कोंडी, अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि रिक्षांची उपलब्धता यामुळे डोंबिवलीकरांचा प्रवास अधिक त्रासदायक होत आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे.

संबंधित विषय (Tags):
#kdmc#dombivli#auto
Share This Article (बातमी शेअर करा):
Vikrant Nalawade

Vikrant Nalawade

Editorial

Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.

Join Do Reports WhatsApp Channel

ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा

Join Channel